
K. L. PONDA HIGH SCHOOL
N. L. ADHIYA MIDDEL SCHOOL
SHRIMATI. KAMLABEN TRIBHUVAN ADHIYA KANYA VIDYA MANDIR
प्राचार्यांचा संदेश

सप्रेम नमस्कार, सन 1926 पासून दी डहाणू एज्युकेशन ट्रस्ट, ज्ञानदानाच्या पवित्र व अखंड परंपरेचे जतन करत सतत शैक्षणिक सेवा करत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आमच्या शाळेची स्थापना ही ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उदात्त ध्येयाने झाली आहे. आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मर्यादित परिस्थितीतून येणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधीची समानता देणे, त्यांना सक्षम आणि सुजाण नागरिक घडवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आमची शाळा विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण, अनुशासन, मूल्यसंवर्धन तसेच सर्वांगीण विकास देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. अध्यापन प्रक्रियेमध्ये काळाच्या गरजेनुसार डिजिटल परिवर्तनाचा स्वीकार करून इंट्रॅक्ट स्मार्ट बोर्ड, प्रोजेक्टर आदी अत्याधुनिक साधनांचा नियमित वापर केला जातो. शिक्षकांची उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीद्वारे नोंदवली जाते, तर कार्यालयीन कामकाजासाठी विद्यालय ऑनलाइन पोर्टल वापरल्यामुळे अचूकता व कार्यक्षमता वाढली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला विशेष प्राधान्य देत संपूर्ण शाळा परिसर सीसीटीव्ही निगराणीत आहे. जलद संवादासाठी P. A. सिस्टीम कार्यरत आहे. विविध परिस्थितींना तोंड देण्यासाठी शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2023- 24 व 2024- 25 या सलग दोन वर्षांमध्ये शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये तालुका स्तरावर अनुक्रमे दुसरा व पहिला क्रमांक मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच त्यांच्या क्रीडा व सहशालेय क्षेत्रातील प्रगतीकडेही आम्ही तेवढ्याच निष्ठेने पाहतो. आमचे अनेक विद्यार्थी विभागीय पातळीवरील क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत आहेत. सन 2023 - 24 व 2024 - 25 या दोन शैक्षणिक वर्षात शाळेचा पालघर जिल्हा क्रीडा विभागात दुसरा क्रमांक आला आहे. तसेच, विद्यार्थ्यांना सर्व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शाळा संपूर्णतः कटिबद्ध आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाविषयी रुची निर्माण करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बे यांच्या सहकार्याने इनोव्हेटिव्ह लॅब उभारण्यात आली आहे. तसेच आपल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय व अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षांचे (NEET व JEE) अभ्यासक्रम विनामूल्य शिकविले जातात. पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने शाळेत सौरऊर्जेचा वापर करून ऊर्जा बचत व पर्यावरण संरक्षणाची जाणीव जोपासली जाते. शाळेत विविध समित्या, शिस्तबद्ध व पारदर्शक पद्धतीने कार्यरत असून त्या विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय सातत्याने घेतात. आमचे सर्व शिक्षक शैक्षणिक व व्यावसायिक अर्हताधारक, अनुभवी आणि समर्पित असल्यामुळे आम्हाला नेहमीच दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत उत्कृष्ट निकाल प्राप्त होत आहे. दी डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी, पालक, माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक यांच्या सहकार्यामुळे संस्थेची प्रगती अधिक वेगाने होत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवण्याच्या आमच्या ध्येयात आपण दाखवत असलेल्या विश्वासाबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहोत.